पर्वती विधानसभा मतदारसंघात भिमाले इच्छुकांच्या रेसमध्ये

Estimated read time 1 min read

पर्वती विधानसभा मतदारसंघात भिमाले इच्छुकांच्या रेसमध्ये

पुणे (प्रतिनिधी) – पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी विजय मिळवला. त्यांच्या या विजयात कोथरूड, कसबा, पर्वती मतदारसंघ आणि पुणेकरांचा सिंहाचा वाटा आहे. खासदार मोहोळ यांना खासदारकीच्या शुभेच्छा देताना भाजपमधील नेत्यांचे विधानसभेचे आणि महापालिकेचे फोटो असलेले बॅनर्स शहरात झळकू लागले आहेत. लोकसभेचा निकाल लागताच इच्छुकांनी पालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.


पर्वती विधानसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांना जवळपास 29 हजारांचे मताधिक्य मिळाले. येथे माधुरी मिसाळ विद्यमान आमदार असून भाजपचे अनेक नगरसेवक देखील याच मतदारसंघातून येतात. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून काम करत असताना अनेक इच्छुक उमेदवार पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने पर्वती मतदारसंघात माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले हे विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा होताना दिसतायेत. पर्वती मतदार संघात मोहोळ याना शुभेच्छा देताना विधानसभेचा फोटो असलेले अनेक बॅनर्स लावत त्यांनी एक प्रकारे आपणही या शर्यतीमध्ये उतरले आहोत हे दाखवून दिले.


2017 मध्ये पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर श्रीनाथ भिमाले यांची सभागृह नेते पदी नियुक्ती करण्यात आली होती. अनेक वर्षांपासून भिमाले पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून देखील काम करत आहेत. भिमाले यांना लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघाच्या समन्वयक पदाची जबाबदारी पक्षाकडून देण्यात आली होती.

या माध्यमातून त्यांनी प्रचारामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. पर्वती विधानसभा मतदारसंघावर मिसाळ कुटुंबाची पकड मजबूत असताना त्यातच आता भाजपमधूनच येथे इच्छुकांची यादी वाढत चालली आहे. यासोबतच महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिवसेना शिंदेगट यांचा सहभाग झाल्यापासून येणाऱ्या या विधानसभा निवडणुकीत कशाप्रकारे जागा वाटप होईल याची मोठी कसरत होताना पाहायला मिळणार आहे.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours