दैनंदिन जीवनातील अधिकाधिक वापर मराठी भाषेला समृद्ध करेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांचे वितरण

मुंबई, दि. २७: तंत्रज्ञान युगात मराठीचाही मोठा पगडा आहे. जेवढी जास्त आपण दैनंदिन जीवनात ही भाषा वापरू तेवढी ती समृध्द होईल. दोन हजार वर्षांची परंपरा असलेली मराठी भाषा कधीही संपणार नाही. भाषा ही प्रवाही हवी. त्यात शब्दांची देवाणघेवाण झाली पाहिजे.  त्यामुळे आग्रहाने मराठी वाचन, लेखन करावे लागेल. मराठी ही अभिजात होती, आहे आणि राहील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मराठी भाषा विभागाच्या वतीने कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अपर मुख्य सचिव  मनीषा म्हैसकर, मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने मराठी भाषा संवर्धनासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीस आणि संस्थेस भाषा संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन 2023 या वर्षासाठी डॉ.रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार तर मनोविकास प्रकाशन, पुणे या संस्थेस श्री.पु.भागवत पुरस्कार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप पाच लक्ष रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे असून श्री.पु.भागवत पुरस्काराचे स्वरूप तीन लक्ष रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे. त्याचबरोबर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2023 (व्यक्ती) डॉ.प्रकाश परब यांना तर संस्थेसाठी देण्यात येणारा पुरस्कार वाङ्मय चर्चा मंडळ, बेळगाव या संस्थेस प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२३ (व्यक्ती) डॉ.कौतिकराव ठाले पाटील यांना तर संस्थेसाठी देण्यात येणारा पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक या संस्थेस प्रदान करण्यात आला. प्रत्येकी दोन लाख रूपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मराठी दिन राज्यात सगळीकडे उत्साहात साजरा होत आहे. या माध्यमातून मराठी भाषेचा जागर होत आहे. ‘बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके’ अशी ही आपली मराठी भाषा आहे.

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी अजरामर साहित्यकृती तयार केल्या. मराठी समाज, भाषा विज्ञान वर डॉ. परब यांचे प्रभुत्व आहे. साहित्य क्षेत्रात कौतिकराव ठाले पाटील यांचे योगदान मोठे आहे. या आणि अशा अनेक भाषा प्रेमी साहित्यिक, लेखक यांनी मराठी भाषेला मानाचं स्थान मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करण्यात येत आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनसाठी राज्य शासनाने भरीव मदत केली. विश्व मराठी संमेलनाला पाठबळ दिले. जगभरातील मराठी बांधव त्यासाठी आले.

खऱ्या अर्थाने मराठी विश्वात्मक झाली असल्याची भावना  त्यांनी यावेळी व्यक्त केली.

परदेशातही मराठी मंडळी आपली भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तेथील मराठी मंडळांच्या माध्यमातून हे काम होत आहे.

दावोस येथे गेलो असताना प्रचंड थंडीत स्वागतासाठी मराठी मंडळी आली होती. रशियात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली, अशी आठवण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितली.  मराठी बद्दल आपुलकी वाढवायची आहे. त्यासाठी नवलेखकांना आपण प्रोत्साहन देत आहोत.  तांत्रिक व्यावसायिक शिक्षण मराठीत देण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी नमूद केले.

मुंबईतील इतर भाषांतील शाळेत मराठी शिकवणे सक्तीचे: मंत्री दीपक केसरकर

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, साहित्यिकांचे वैचारिक स्वातंत्र्य आहे. त्यांच्या भूमिकेला पाठबळ देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. साहित्य संमेलनासाठी पन्नास लाख वरून दोन कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. परदेशात आणि बृहन्महाराष्ट्र मराठी  भाषेचा जागर होत आहे. परदेशातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या अभ्यासक्रमासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जवळपास ७२ देशात मराठी बोलणारी मंडळी राहतात. बृहन्महाराष्ट्र भागात तेथील लोकांना संमेलनासाठी आपण मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या या क्षेत्रातील खाणाखुणा जपण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतला आहे. नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे मातृभाषेतून देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. त्याची सर्वप्रथम अंमलबजावणी राज्य शासनाने सर्वप्रथम केली. मुंबईत मराठी भाषा भवनाची उभारणी होत आहे.  मराठी भाषा बृहन्महाराष्ट्र क्षेत्रात टिकावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. नवी मुंबईला साहित्यिक भवनाची उभारणी केली आहे.  मराठी विश्वकोश कार्यालयासाठी वाई येथे नवीन जागा खरेदी करून त्यात स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.  सध्या राज्यातील सहा शहरात आपण पुस्तकांचे गाव ही संकल्पना राबवित आहोत.

मराठी भाषा शिकविण्यास टाळाटाळ करणाऱ्या शाळांवर मराठी शिकवणे सक्तीचे करण्यात. आले आहे.  तरीही  या शाळांनी त्याची अंमलबजावणी केली नाही तर त्या बंद करण्याचे पाऊलही उचलले जाईल, असे त्यांनी नमूद केले. याशिवाय मंत्रालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये प्रत्येकाने आवर्जून मराठी बोलावे यासंदर्भात परिपत्रक काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त विशाखा विश्वनाथ आणि एकनाथ आव्हाड यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या ३९ पुस्तकांचे प्रकाशन मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. नवलेखक अनुदान योजनेत पुरस्कार प्राप्त सुधीर शास्त्री यांच्या माणूस या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर आणि कुणाल रेगे यांनी केले तर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सुत्रसंचलन अभिनेता तुषार दळवी आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी केले. यावेळी जीवनगाणी प्रस्तुत मान मराठीचा सन्मान महाराष्ट्राचा हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours