देशात प्रथमच ११ गणेश मंडळांच्या संयुक्त मिरवणुकीचा शहरात नवा पायंडा 

Estimated read time 1 min read

पुणे, १३ सप्टेंबर: सर्व धर्म समभाव, प्रत्येकाच्या मना मनात राष्ट्र भक्ती, राष्ट्रीय एकतेचे बीज पेरणे व या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्यभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. याचाच आधार घेऊन महाराजांच्या ११ मावळ्यांच्या संकल्पनेनुसार धनकवडी येथील ११ गणेश मंडळांनी एकत्रित येऊन देशातील सर्वात मोठी एकत्रित सार्वजनिक मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक स्वराज्य रथावर म्हणजेच ज्यात११ गणेश मंडळांचे गणपती विराजमान करून भव्य मिरवणूक काढण्यात येईल. अशी माहिती अखिल मोहन नगर मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित पोळ व विश्वस्त अनिरूद्ध येवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील अन्य गणेश मंडळांनीही एकत्रित येऊन नवा पायंडा घालण्यासाठी हा उपक्रम आहे. त्यामुळे अशी चळवळ पुढे चालण्याचे आवाहन या परिषदेत करण्यात आले.
एकत्रित सार्वजनिक मिरवणूकीत धनकवडी येथील साईनाथ मित्र मंडळ, श्री शिव छत्रपती मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ, फाईव्ह स्टार मित्र मंडळ, केशव मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मंडळ, अखिल नरवीर तानाजी नगर मित्र मंडळ , एकता मित्र मंडळ, विद्यानगरी मित्र मंडळ,, रामकृष्ण मित्र मंडळ, आणि अखिल मोहन नगर मित्र मंडळ या सारखे ११ गणेश मंडळ एकत्रित येऊन देशातील सर्वात मोठ्या एकत्रित मिरवणूकीचे आयोजन मंगळवार दि. १९ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते सायं. ५ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या मध्ये जवळपास ८ ते १० हजार नागरिक सहभागी होणार आहेत. ही मिरवणूक गुलाबनगर, धनकवडी येथून सुरू होऊन धनकवडी गाव, केशव कॉम्प्लेक्स, विद्यानगरी शिवशंकर चौक ते मोहनगर येथे काढण्यात येत आहे. या मध्ये ज्ञानप्रबोधिनी वाद्य आणि गोविंद बँड पथक असणार आहे.
मिरवणूकीच्या प्रारंभी सर्व सफाई कर्मचारी आणि राष्ट्रीय पातळीवर धनकवडीचे नाव उंचावणार्‍या खेळाडुंचा सन्मान करण्यात येणार आहे. सर्व मंडळांच्या सहयोगाने २४ सप्टेंबर रोजी आयोजित आरोग्य शिबिरात  डायबेटीज व किडनी तपासणी पासून अनेक निःशुल्क चाचण्या केल्या जाणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. वरील सर्व मंडळांच्या सहयोगाने संपूर्ण वर्षभर विविध समाजउपयोगी कार्यक्रम चालविले जाणार आहेत.
गेल्या वर्षी धनकवडी मध्ये ९ गणेश मंडळांनी एकत्रित येऊन मिरवणूकीचा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला होता. या वर्षी याच कार्याची रेघपुढे ओढत ११ गणेश मंडळांनी सहभाग घेऊन ही मिरवणूक यशस्वीपणे पुर्ण करण्याचा संकल्प घेतला आहे.
या परिषदेत संतोष धनकवडे, उदय जगताप, आनंद शिंदे, विजय क्षीरसागर, प्रतिक कुंभार, अभिषेक तापकीर, अनिकेत झाडे, अजय इंगळे, मिलिंद काळे व सोमनाथ शिर्के व अन्य मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours