श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ची जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजना -

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ची जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजना

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट संचलित जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेमधील इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. योजनेंतर्गत रेणुका स्वरुप प्रशालेमध्ये शिकणारी गंधाली सणस ही विद्यार्थीनी ९६.४० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. जय गणेश पालकत्व योजनेतील आणखी ७ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा पुढे गुण मिळविले असून १२ विद्यार्थ्यांनी ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. महाराष्ट्र विद्यालयात शिकणारा सत्यजित भंडारी याला ९५.८० टक्के, भावे हायस्कूलमध्ये शिकणा-या लक्ष लोखंडे याला ९४.६० टक्के, विमलाबाई गरवारे प्रशालेत शिकणा-या प्रेरणा गव्हाणे हिला ९३.८० टक्के, अहिल्यादेवी हायस्कूलमधील सामली राठोड हिला ९३.८० टक्के, रमणबागेतील सोहम इजंतकर याला ९२.६० टक्के व इशान मोरेश्वर याला ९२.४० टक्के आणि न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड येथे शिकणा-या वेदांत वाडेकर याला ९२.२० टक्के गुण मिळाले आहेत. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. ट्रस्टतर्फे सर्व विश्वस्तांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देखील केले आहे. मानवसेवेचे मंदिर उभारताना विद्यार्थी शिक्षणाच्या दृष्टीने देखील ट्रस्ट सातत्याने कार्यरत आहे. पालकत्व योजनेतील विद्यार्थीनी गंधाली सणस म्हणाली, आणखी शिक्षण घेऊन मोठे व्हायचे माझे स्वप्न आहे. माझे वडील हयात नसून आई एका संस्थेमध्ये नोकरी करते. आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ट्रस्टने मदतीचा हात दिला आणि सर्वतोपरी जे सहकार्य केले त्याचा माझ्या यशात फार मोठा वाटा आहे. मी थ्रो बॉल आणि अ‍ॅथलेटिक्स या खेळांमध्ये सहभागी होते. शालेय टिमकडून मी थ्रो बॉल मध्ये सहभाग घेतला असून जिल्हा परिषद स्तरावर विजेतेपद देखील मिळविले आहे. खेळासोबतच अभ्यासाकडे देखील मी नेहमी लक्ष देत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.