उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते महारेशीम अभियानाचा जिल्ह्यात शुभारंभ -

उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते महारेशीम अभियानाचा जिल्ह्यात शुभारंभ

पुणे,दि. ८: रेशीम उद्योग करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची नाव नोंदणी करुन घेण्याच्या दृष्टीने राज्याच्या रेशीम संचालनालयाच्या वतीने महारेशीम अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यात महारेशीम अभियानाचा शुभारंभ राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून आज करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपजिल्हाधिकारी संजय तेली,

जिल्हा रेशीम विकास अधिकारी डॉ. कविता देशपांडे, रेशीम अधिकारी विश्वजीत पावसकर व प्रमोद शिरसाट आदी उपस्थित होते.

कामगार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. वळसे-पाटील यांनी महारेशीम अभियानास शुभेच्छा दिल्या. तसेच या अभियानात अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करुन घ्यावे,असे सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, रेशीम उद्योगात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची क्षमता असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा.

राज्यातील रेशीम शेतीचे महत्त्व आणि त्यातून मिळणाऱ्या शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती होण्याच्या दृष्टीने महारेशिम अभियान राबविण्यात येत आहे.

हे अभियान 15 फेब्रुवारी पर्यंत सुरु राहणार असून तुती लागवड व रेशीम लाभार्थ्यांची नाव नोंदणी या अभियानांतर्गत करण्यात येत आहे,

असे सांगून योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी कविता देशपांडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.