खा. अमोल कोल्हे यांचा शिवसेनेवर निशाणा -

खा. अमोल कोल्हे यांचा शिवसेनेवर निशाणा

पुणे (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वरदहस्त असल्यामुळेच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. नाशिक महामार्गाच्या बाह्यवळण आणि घाटाच्या उद्घाटनावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवाद पाहायला मिळाला.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एक दिवस अगोदरच या बाह्यवळण आणि घाटाचे उद्घाटन केले, तर अधिकृत निमंत्रणपत्रिकेत आढळराव पाटील यांचे नाव नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा या निमंत्रणपत्रिकेत फोटोही नाही. त्यामुळे आढळराव पाटील यांनी एक दिवस अगोदरच आक्रमक होत, शिवसैनिकांसह खेडच्या घाटाचे आणि नारायणगाव बाह्य वळणाचे उद्घाटन उरकून घेतले. या पुणे-नाशिक महामार्गाच्या कामात कोणतेही योगदान नसताना विनाकारण या कामाचे श्रेय खासदार डॉ. कोल्हे घेत आहेत, अशी टीका आढळराव पाटील यांनी केली होती, तर शनिवारी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या कामाचे उद्घाटन केले. यावेळी डॉ. कोल्हे यांनीही आढळराव पाटील यांच्यासह शिवसेनेवर सडकून टीका केली. अशा वयस्कर नेत्यांनी पोरकटपणा करावा याचे मला आश्चर्य वाटते, असे खा. अमोल कोल्हे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांविषयी मनात आदर आहे. संसदेत महाराष्ट्राची, महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांची बाजू कोण मांडते? हे पण तुम्हाला समजून जाईल. माझ्यावर आणि कार्यकर्त्यांवर टीका करणे, हा एककलमी कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली लपवला जात असेल, तर ठाकरे मुख्यमंत्री आहेत, त्याचे कारण शरद पवार यांचा वरदहस्त त्यांच्या डोक्यावर आहे, अशी टीका कोल्हे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *