अपूर्ण कामे गतीने पूर्ण करा – कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील -

अपूर्ण कामे गतीने पूर्ण करा – कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील

आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यातील अडीअडचणींबाबत आढावा बैठक

पुणे,  दि. 8 : आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यातील कामांचा निपटारा वेळेत करा. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा. अपूर्ण कामे गतीने मार्गी लावा, अशा सूचना कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केल्या.

आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यातील अडीअडचणींबाबत शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी,

 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पंचायत समिती सभापती संजय गवारी, प्रकाश घोलप तसेच विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

आंबेगाव तालुक्यातील गावांमध्ये विविध कामे व उपाययोजना करण्यासाठी मंजूर निधीमधून कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी मंजुरी मिळणे, शासकीय विकास कामांसाठी आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीचे संमतीपत्र ग्राह्य धरुन सातबारा वर नोंद करणे, 

आद्यक्रांतीकारक होणाजी भागू केंगले यांच्या नावाचा समावेश पंचायत समितीच्या शिलालेखात करणे, अतिउपसा म्हणून घोषित झालेली गावे वगळणे, जुन्या सार्वजनिक मालमत्तांच्या नोंदी सातबारावर होणे,  वैयक्तीक व सामुहिक वनदावे तातडीने मंजूर करण्यासाठी प्रक्रिया राबविणे, निरगुडसर अंतर्गत पुनर्वसन गावठाणांच्या ग्रामपंचायती विभक्त करण्याचे प्रस्ताव शासनास पाठविणे, डिंभे धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे,

 हिरडा खरेदीसाठी महामंडळामार्फत भाव निश्चित करणे, चक्रीवादळामध्ये झालेल्या हिरड्याची नुकसान भरपाई मिळणे, इको सेन्सीटीव्ह झोन मधून खाजगी क्षेत्र वगळणे,  उपविभागीय कार्यालयासाठी जागा उपलब्ध करणे, शिरुर ते मलठण विद्युतवाहिनीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

तसेच मंचर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदभरती व अडीअडचणींबाबतीत चर्चा केली. या रुग्णालयात आवश्यक त्या वैद्यकीय सेवा सुविधा व साधनसामग्री तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचना कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिल्या.

शासन स्तरावरील प्रस्तावांसाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा. चक्रीवादळामध्ये झालेल्या हिरड्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना श्री.वळसे-पाटील यांनी बैठकीत दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *